औरंगाबाद: महावितरण प्रशासनाच्या वतीने दर शुक्रवारी काही वेळाकरिता वीज पुरवठा खंडित करून मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे केली जात आहे. शनिवारी शहरात काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी होताच अनेक वसाहतीत पाच तास वीज गुल होती. यामुळे महावितरणच्या मान्सूनपूर्व कामाचा फज्जा उडाला आहे.
पावसाळ्यात वादळीवाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे वीज पुरवठा करताना कुठे तारा तुटणे, झाडाच्या फांद्या वाहिनीवर पडणे, अशा अनेक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होत असतो. हा प्रकार घडू नये म्हणून महावितरण प्रशासनाच्या वतीने मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. सध्या दर शुक्रवारी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. यानंतर देखील शनिवारी शहरात ठिकाणी पाऊस झाला या पावसानंतर महावितरणच्या दुरुस्तीचा फज्जा उडाला आहे. वादळी वारा पावसामुळे देवळाई परिसरातील अनेक वसाहतींचा वीजपुरवठा खंडित झाला. यासह सिडको, हडको, गारखेडा, उस्मानपुरा परिसरातील झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर कोसळल्या. त्यात खांबावरील पिन इन्सुलेटर फुटल्यामुळे गारखेड्यातील शास्त्रीनगर, अशोकनगर, शिवनेरी कॉलनी, जवाहर कॉलनी, भगवती कॉलनी, उल्कानगरी, त्रिमूर्ती चौक, जालना रोडचा काही भाग, चिकलठाणा परिसर आदी भागात सुमारे पाच तास वीज गायब होती. देवळाई परिसरात रात्री दहापर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु साई टेकडी परिसरात खांब कोसळल्याने तांत्रिक कारणामुळे देवळाई तांड्याचा वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.